इतिहास
श्री रामचंद्र कृष्ण कामत चंदगडकर (उर्फ अण्णा) व श्री विठ्ठल कृष्ण कामत चंदगडकर (उर्फ अप्पा) ह्यांचे मूळ गाव हे महाराष्ट्रातील चंदगड (बेळगांवहून सुमारे २५ कि.मी.). त्यांचे वडिल श्री कृष्णाजी यशवंत कामत हे या मुलांच्या शिक्षणासाठी बेळगांवात येऊन राहिले. त्यावेळी (म्हणजे सन १९१०) बेळगांवात प्लेग रोगाची भयंकर साथ आली होती. त्यातचं श्री कृष्णाजी कामत यांचे निधन झाले. त्यानंतर हे कामत बंधु अस्नोडा, गोवा येथे आपल्या मामाच्या घरी आपल्या आई व पत्नीला घेऊन आले.
एके दिवशी श्री अप्पा कवळे येथे प. पू . आत्मानंद सरस्वती स्वामींच्या दर्शनाला गेले असता त्यांनी श्री अप्पांना आध्यात्मिक उपदेश केला. ह्या पार्श्वभूमीवर पुढे एके दिवशी पहाटे श्री अप्पांना दत्तावतारी प. पू . पंतमहाराज बाळेकुंद्रीकर (जे अप्पांना बेळगावी असताना शाळेत शिकवित असत) यांचा दृष्टांत झाला की “तुझे कुलदैवत माशेल येथे श्री शांतादुर्गा तळावलीकरीण म्हणून आहे. तिथेच एक औदुंबर वृक्ष व त्याच्याजवळ जुन्या पादुका आहेत. तिथे दत्तमूर्तीची स्थापना करून तिथेच राहून कुलदेवी व श्री दत्ताची सेवा व उपासना करावी. तुझ्या हातून त्या ठिकाणी १२ सहस्रभोजने होणार आहेत…” वगेरे
त्याप्रमाणे हे कामत बंधु अस्नोड्याहून माशेल येथे देवीच्या अग्रशाळेत येऊन राहिले. पुढे एके दिवशी माणगावच्या प. पू . टेंबे स्वामी महाराजांचे समकालीन, काशीचे श्री. ब्रम्हानंद सरस्वती स्वामी तिथे आले व त्यांनी प. पू . टेंबे स्वामींना ज्या स्वरूपात श्री दत्ताचे दर्शन झाले तशीच ‘एक मूखी षट्भूज’ दत्तमूर्ति जयपूरहून करवून पाठवली. प. पू . अण्णांनी माघ शुक्ल ५ शके १८५२ (सन १९३०) या दिवशी ब्राह्मणाकरवी संपूर्ण धार्मिक विधीने माशेल येथील औदुंबर वृक्षाजवळ प्रतिष्ठापना केली. पुढे पंतमहाराजांनी दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे तिथे १२ सहस्रभोजने घातली गेलीच.
मंदिराची वैशिष्ट्ये
श्री दुर्गादत्त मंदिर माशेल मध्ये श्री शांतादुर्गा तळावलीकरीण देवळाजवळ आहे. देवळाची सध्याची इमारत २००० मध्ये जीर्णोध्दारीत केलेली आहे. परंतु देवळाच्या गाभाऱ्याची पुढचा कोरीव, लाकडी दर्शनी भाग अजूनही मूळस्वरूपातील आहे. देवळाच्या प्रदक्षिणेमध्ये आजही अप्पांना दृष्टांतात दिसलेला औदुंबर व पादुका बघायला मिळतात.
गाभाऱ्याच्या लाकडी दारावर कुंडलिनी शक्तीची मूलाधार ते सहस्राधार अशी ७ चक्रे अशा प्रकारे कोरलेली गेली आहेत कि दार बंद असताना सुध्दा आपण देवाचे दर्शन देऊ शकतो. तसेच दरवाजाच्या दोनही बाजूंना ४ वेदांचे सार सांगणारी ४ ब्रह्मवाक्ये कोरलेली आहेत.
देवळातल्या दत्तमूर्तीला वाराप्रमाणे शंकर, लक्ष्मी, पांडुरंग, दत्तमहाराज, सरस्वती, माणिकप्रभु, ज्ञानेश्वर अशा स्वरूपात शृंगारले जाते. ह्याच जागी श्री अण्णांनी जवळ जवळ २० वर्षे परिश्रम घेऊन ‘श्री गुरुचरित्र’ ह्या प्रासादिक ग्रंथाचे संशोधन केले. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती विजयादशमी शके १८६२ (सन १९४०) ह्या मुहूर्तावर ढवळे प्रकाशन मार्फत प्रसिद्ध करण्यात आली. अण्णांनी पुढे ‘एकनाथी भागवत’, ‘नामजपाचे महत्व’, ‘नामचिंतामणी’ असे अनेक प्रसिद्ध ग्रंथ लिहिले/संपादित केले.